राज्यात एकीकडे खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत ठोस पावलं उचलण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर खोचक टीका केली. “आम्हाला पण रस्त्यावर उतरायला पाहिजे”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्यानंतर त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हा तर अजित पवारांचा दांभिकपणा आहे. मराठा समाज तसाही अजित पवारांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. “मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे. माझ्या वक्तव्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आधीच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुका केल्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे. समाजातील सामान्य माणसाच्या या विषयात भावना तीव्र आहेत, याची अजित पवार यांनी दखल घ्यावी आणि अशी कुचेष्टा करू नये”, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला.

…अन्यथा वेळ निघून जाईल!

याआधी, “मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. तसेच, गुरुवारी देखील कोल्हापूरमध्ये बोलताना पाटील यांनी “मराठा आरक्षणासंदर्भात होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होतील. भाजपा स्वत: आंदोलन करणार नाही, परंतु समाजाच्या आंदोलनात पक्ष कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होतील”, असं म्हटलं होतं.

“आता दादांचं ऐकायला पाहीजे. मी राजेश टोपे आम्ही सगळे मराठा समाजातले. आम्हांला पण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे”, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला होता.

“…अन्यथा कोविड वगैरे काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल!”

“माझ्यामुळे लोकं शांत आहेत”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संध्याकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संभाजीराजे भोसले यांनी राजगडावरून आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. “मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर ६ जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे ६ जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: ५ मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं?”, असं ते म्हणाले आहेत.