आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान विधानावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असून त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

चंद्रकात पाटील काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीसांमुळेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारला ही केस न्यायालयात व्यवस्थित चालवता आली नाही, त्यामुळे हे आरक्षण गेलं. अशा वेळी अडीच वर्षा तुम्ही आंदोलनं का केली नाहीत, आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केले असते, असं तानाजी सावंताना म्हणायचे होते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची मोडतोड केली जात आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, “पुढचे दहा जन्म तुमची…”; सेनेकडून जशास तसं उत्तर

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

“रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील”, असे ते म्हणाले.