मशिदींवरील भोंगे हटविले नाही तर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतली. औरंगाबादच्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण करणारे भाषण केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी राज यांनी पत्रक जारी करुन जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. दरम्यान राज ठाकरेंना अटक होते की काय यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मंगळवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरच सुरु झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या प्रकरणामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा उल्लेख करत वेगळीच शंका उपस्थित केलीय.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंसारख्या लोकांना…”; राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आवाहनानंतर मोदींचा उल्लेख करत राष्ट्रवादीचं प्रतिआवाहन

राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार बुधवारपासून मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील काही विधानांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन समूहांत तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषण, अटी शर्थीचा भंग केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय.

नक्की पाहा >> “ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज…”; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा जुना Video

“हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी विचारलाय. तसेच अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी, “बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल,” असंही म्हटलंय.

दरम्यान, मनसेच्या १५० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, दृक्श्राव्य माध्यमांतून राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भाषणांना सायबर पोलीस ठाण्यातून तपासणी, अवलोकन करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

नक्की वाचा >> राज ठाकरेंनी आवाहनाचं पत्रक पोस्ट केल्यानंतर तासाभरातच राऊतांचं ट्विट; शरद पवारांना टॅग करत म्हणाले, “निकले हैं वो लोग हमारी…”

औरंगाबादमध्येही सतर्कता..
शहरात कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून औरंगाबाद पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ४५ ठिकाणी मंदिरे व मशिदीतील अंतर कमी आहे. औरंगाबाद शहरात १,०४८ मंदिरे व ४२० मशिदी आहेत. या प्रार्थनास्थळावर करडी नजर असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोटिसा आणि पोलीस कुमक..
राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत.