आर्यन खान प्रकरणामधील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आल्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ट्विटरवरुन या प्रकरणी भाष्य केलंय. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा आर्यन खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आल्यानंतर आज सकाळीच मलिक यांनी ट्विट करुन, समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केलीय. मात्र मलिक यांच्या या ट्विटवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यामध्ये बोलताना मलिक यांना मंत्री मंडळातून काढून टाकल्याचा खोचक टोला लगावला आहे. मंत्र्यानेच एसआयटीची मागणी करणं हे थोडं विचित्र असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलंय.

काय ट्विट केलंय मलिक यांनी?
“आर्यन खानचं अपहरण आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर दाऊद वानखेडेंची एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी मी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. पाहुयात, यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचं सत्य जगासमोर आणतं ते”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी आज सकाळी पावणे आठच्या सुमारास केलं आहे.

पाटील यांचा टोला
याचसंदर्भात पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, “नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रीमंडळामधून राजीनामा दिलाय. तुम्ही जर मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहात तर तुम्ही प्रेसच्या माध्यमातून का मागणी करताय,” असं म्हणत मलिक यांना टोला लगावला.

“संपूर्ण सरकार तुमच्या हातात आहे. एक गृहमंत्री (अनिल देशमुख) जरी जेलमध्ये गेलेत. दुसरे गृहमंत्री (दिलीप वळसे-पाटील) आजारी होते ते काल बरे झालेत. तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. एसआयटी नेमा नाहीतर डबल एसआयटी नेमा. रोज सकाळी उठून ट्विट करा, प्रेस घ्या; म्हणजे मंत्रीमंडळातून तुम्हाला काढलेलं दिसतंय. मंत्रीमंडळातून काढलेल्या माणसानेच मागणी करायची असते,” असंही पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.