काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यात काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचीही चर्चा होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील अधिवेशनात बोलू न दिल्याने अजित पवार नाराज असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील सभेत केला. यानंतर पत्रकारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना नाराजीची चर्चा असणारे अजित पवार भाजपाच्या संपर्कात आहेत का? असा थेट सवाल केला. यावर बावनकुळेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१३ सप्टेंबर) नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने काय करावं, पक्षात किती वाद करावेत, घरात वाद करावेत किंवा रस्त्यावर करावेत हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव गटाने असं म्हटलं की, आम्हाला आमच्या पक्षात राहण्यात रस नाही, तर आम्ही चांगल्या लोकांना नक्की पक्षात घेऊ. मात्र, आम्ही त्यांना फोन करणार नाही, पक्षात या असं कुणी म्हणणार नाही.”

“ज्यांना भाजपात यायचं आहे त्यांना भाजपा प्रवेश देईल”

“महाविकासआघाडीचे कार्यकर्ते मागच्या सरकारला कंटाळले होते आणि या सरकारवर त्यांचा विश्वास आहे. मागच्या सरकारकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. कारण अडीच वर्षांपैकी १८ महिने मुख्यमंत्री नव्हतेच. आता दोन्ही सरकारमधील फरक लक्षात घेऊन ज्यांना भाजपात यायचं आहे त्यांना भाजपा प्रवेश देईल,” असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं.

“तुम्ही डोक्यावर हात ठेऊन म्हणाल हे कसं झालं?”

मोठे मासे गळाला लागणार का? यावर बावनकुळे म्हणाले, “तुम्हाला अशा बातम्या येतील की तुम्ही डोक्यावर हात ठेऊन म्हणाल हे कसं झालं? जसं सरकारच्या बाबतीत झालं, रात्रीतून मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली, तसेच अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील. नंदूरबारमध्ये असं कसं झालं याचं अनेकांना आश्चर्य वाटेल.”

“ईडी असो की आयटी कुणी कितीही घरी आलं तरी काय फरक पडतो?”

हे ईडी सरकार आहे या आरोपावर ते म्हणाले, “उगाच कुणावरही ईडीची किंवा आयकर विभागाची कारवाई होत नाही. विरोधकांनी काहीच केलं नाही, एकदम प्रामाणिकपणे आयुष्य घालवलं आहे तर ईडी असो की आयटी कुणी कितीही घरी आलं तरी काय फरक पडतो? त्यांनी काही तरी केलं असणार म्हणूनच तुम्ही ईडीला घाबरत आहात.”

हेही वाचा : “पितृपक्षामुळे अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही”, अजित पवारांच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले…

“तपास यंत्रणा कधीही कुणाच्या प्रभावात काम करत नाहीत”

“तपास यंत्रणा कधीही कुणाच्या प्रभावात काम करत नाहीत. त्या केवळ आणि केवळ त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे काम करतात. त्यांच्याकडे अवैध पद्धतीने मालमत्ता जमा केल्याची माहिती असेल त्यामुळेच या कारवाया झाल्या,” असं बावनकुळेंनी नमूद केलं.