लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार करत असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?” असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर आज महत्त्वाची सुनावणी झाली. न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर आज सायंकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यात आणि देशात आम्ही जातीयवादी लोकांना ठेचून काढणार आहोत. राहुल गांधींच्या वक्तव्याचा महाराष्ट्रभर निषेध करणार आहोत. काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी मोदींचा अपमान केला, त्यांना चोर म्हटलं, त्यांच्या समाजाचा अपमान केला, जातीचा अपमान केला, या प्रवृत्तीला आम्ही झोडून काढू.”

बावनकुळे म्हणाले की, “त्या वक्तव्यामुळे यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजातून येतात, तो समाज राहुल गांधी यांचा निषेध करतोय. तेली समाज हा ओबीसींमधला मोठा घटक आहे. मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. अखेर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. न्यायालयाकडून ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे.”

हे ही वाचा >> संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

ओबीसी समाज त्यांना जागा दाखवेल : बावनकुळे

दरम्यान, राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी एक दिवस तुरुंगात जातील. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. हा समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule slams rahul gandhi statement on narendra modi asc