Chandrashekhar Bawankule On Parth Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर विरोधकांनी पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील सदर व्यवहार प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर अंबादास दानवे यांनी या प्रकरणात कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या व्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया देत सूचक इशारा दिला आहे. ‘माझ्याकडे तक्रार आली की मी लगेच कारवाई सुरू करणार’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“आतापर्यंत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मला सकाळी अंजली दमानिया यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की मंगळवारी संपूर्ण केस त्या माझ्याकडे फाईल करणार आहेत. आता प्रश्न राहिला महार वतन जमीनीबाबत निर्णय घेण्याचा, तर त्याबाबत एक विशेष कायदा आहे. आपल्याला त्यात तपासावं लागेल की या जमीन कायद्यानुसार तो व्यवहार झाला की नाही?”, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“तसेच मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या संदर्भातील देखील एक कायदा आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या नियमांखाली मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आली? हे उद्योग विभाग तपासेल. कारण जेव्हा एमआयडीसी प्रकल्पांच्या नियमामध्ये एखाद्या प्रकल्पाला सवलत दिली असेल तर ती सवलत नियमात दिली गेली आहे का की नाही हे उद्योग विभाग तपासेल. कारण जेव्हा आयटीपार्कचं धोरण आलं होतं तेव्हा मंत्रिमंडळाने काही सवलती जाहीर केल्या होत्या. मग त्या सवलतीमध्ये हे प्रकरण येत आहे का की नाही? किंवा परस्पर सवलती देण्यात आल्या आहेत? याबाबत अंजली दमानिया ११ तारखेला माझ्याकडे तक्रार करणार आहेत. त्यानंतर मी त्यावर तपासणी करेन”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“महसूलच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये काही गडबड केली आहे का? हे मला पाहावं लागेल. तसेच मुद्रांक शुल्क विभाग माझ्याकडे असला तरी मुद्रांक शुल्क विभागाने आयटीपार्कबाबत काही सवलती दिल्या आहेत का? याचीही तपासणी करावी लागेल. विरोधकांनी जरी आरोप केले असले तरी मी मंत्री म्हणून या संदर्भात माझ्याकडे अद्याप अधिकृत विषय आलेला नाही. पण महार वतन जमीनीचा जो कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व कायद्याची अंमलबजावणी केली का? हे तपासण्याचे अधिकार मला आहेत. याबाबत कोणीतरी फाईल केली पाहिजे. हे प्रकरण माझ्याकडे अद्याप फाईल नाही. माझ्याकडे आल्यानंतर मला त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

‘तक्रार आली की मी कारवाई सुरू करणार…’

पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणत आहेत की संबंधित जमीन सरकारच्या ताब्यात आहे, तर दुसरीकडे विरोधक वेगवेगळे आरोप करत आहेत, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई सुरू करतो.”

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्यावर आरोप होताच माध्यमांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली. यावर नागपूर येथे बोलत असताना ते म्हणाले, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू. उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.