मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव आणि वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. रवींद्र वायकर यांची रायगड जिल्ह्यातील जमीन खरेदी आणि जोगेश्वरीतील अनधिकृत हॉटेलच्या बांधकामावरून किरीट सोमय्या यांनी रान उठविले होते. त्यावरून ईडीनेही चौकशी करून कारवाई केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांनीही विधिमंडळ व जाहीरपणे उद्धव ठाकरेंसह या नेत्यांवर आरोप केले होते. यामिनी जाधव व त्यांचे पती यशवंत जाधव यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू असून काही संपत्ती जप्तही केली आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाने ध्वनिचित्रफीत व अन्य आरोप केले होते. आपणच ज्या नेत्यांच्या गैरव्यवहारांविरोधात आवाज उठविला, त्यांनाच निवडून देण्यासाठी प्रचार करण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे. जाधव आणि वायकर यांची नावे जाहीर होताच या मतदारसंघांतील स्थानिक भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्याची मागणी केली, त्यांचा प्रचार करण्याची वेळ आल्याने जनतेपुढे कोणत्या तोंडाने जायचे, असा प्रश्न  पडला आहे. उमेदवारांविरोधात नाराजी असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होण्याचीही भीती काही भाजप पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करावयाचे असल्याने तीव्र नाराजी असूनही भाजप कार्यकर्ते व मतदार हे महायुतीलाच मतदान करतील, असेही त्यांना वाटत आहे.

संयमाची परीक्षा

शिवसेनेत बंड केल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचा शब्द खाली पडू देत नाहीत हे नेहमीच अनुभवास येते. सरकारचा कारभार करताना मोदी-शहा यांचा सातत्याने ते उल्लेख करीत असतात. लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे यांना गोड बोलून गुंडाळणार अशीच शक्यता वर्तविली जात होती. कारणही तसेच होते. रामटेक, यवतमाळ-वाशीम आणि हिंगोली मतदारसंघातील विद्यमान खासदारांना भाजपमुळे उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिंदे भाजपला सरळसरळ शरण गेल्याचे चित्र होते. लोकसभेच्या ३० ते ३२ जागा भाजपला मिळतील असाच एकूण सूर होता.  पण जागावाटपात शिंदे संख्याबळावर अडून बसले. पक्षाचे १३ विद्यमान खासदार आहेत. तेवढया तर जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. कमी जागा मिळाल्यास उद्धव ठाकरे यांना टीका करण्यास आयती संधी मिळेल, अशी शिंदे यांना भीती होती. शिंदे यांनी फारच ताणून धरल्याने राज्यातील भाजप नेत्यांचाही नाइलाज झाला. शेवटी भाजप २८, शिंदे गट १५, अजित पवार गट ४ तर जानकर एक असे जागावाटप झाले. शिंदे यांनी जागावाटपाच्या चर्चेत संयम पाळला होता. कधीही मतप्रदर्शन केले नव्हते. शेवटी शिंदे यांचा संयम फळाला आला.

हेही वाचा >>> सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ राज्यपालपदासाठी भाजपच्या वाटेवर; डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट

सर्वांना एकच न्याय नाही का?

काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईतून मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षां गायकवाड यांना उमेदवारी दिल्यापासून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.  गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर आता त्यांचे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदही त्यांच्याकडे कायम राहणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र तेव्हा निरुपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला होता. त्या वेळी पक्षाने थेट कोणतेही कारण जाहीर केले नव्हते. मात्र निवडणुकीची उमेदवारी दिल्यामुळे राजीनामा द्यायला लावल्याची त्या वेळी चर्चा होती. पण नंतर लगेचच मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष केले व त्यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनीही अध्यक्षपद सोडले होते.   मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्यासाठी वेगळा न्याय लावणार का, अशी कुजबुज पक्षात सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संकलन : इंद्रायणी नार्वेकर, उमाकांत देशपांडे, विकास महाडिक)