राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचं मत माडलं आहे. “शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत. मात्र त्यांचा पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले आहेत,” असं मत ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच या अग्रलेखात म्हटलं आहे की, “भारतीय जनता पार्टीची पोटदुखी अशी आहे की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था देखील पूर्ण झाली होती. परंतु शरद पवारांच्या खेळीने भाजपाची योजना फसली.” या अग्रलेखावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील संजय राऊतांचा समाचार घेतला.

भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हटलंय त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु संजय राऊतांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे, त्यांना काय अडचण आहे? त्यांना अस वाटतं का, की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे.

हे ही वाचा >> “काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाल्यामुळे…”, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर नाना पटोलेंची भूमिका स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार छगन भुजबळ म्हणाले, “संजय राऊतांचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांचं राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत.” सामनातील बॅगांबाबतच्या टिप्पणीवर छगन भुजबळ म्हणाले, काय माहिती ते (संजय राऊत) कोणाकोणाच्या घरात गेले होते, कोणाकोणाच्या बॅगा त्यांनी तपासल्या हे त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यांनी शिंदे ग्रुपवर ठेवलं असतं, त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज आपल्याला बाहेर बसावं लागलं नसतं, आजची परिस्थिती आली नसती.