“केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल, तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी,” अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. ते मंगळवारी (२६ जुलै) मुंबईतील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारीणीच्या बैठक बोलत होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, “ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळावा यासाठी राज्यसरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. महेश झगडे यांच्यासारखे हुशार लोक त्यात घेतले मात्र महेश झगडे एकटेच लढत होते. आयोगाने अनेकवेळा घेतलेल्या भूमिकांना देखील आमचा विरोध होता. आयोगाच्या रिपोर्ट मध्ये अनेक त्रुटी देखील आहेत. मात्र त्या दुरुस्तीसाठी आता आपण प्रयत्न करणार आहोत.”

“समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात जा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या महात्मा फुले यांनी सुरू केली. दुसरी कोणीही नाही. मात्र, काही लोक जाणूनबुजून चुकीचा इतिहास सांगतात, असा आरोपही त्यांनी केला.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “समता परिषदेने मोठा संघर्ष हा नेहमीच केला आहे.आता देखील लोकांमध्ये फिरून ओबीसींची संख्या ही ५४ टक्के आहे हे आपण सांगितले पाहिजे आणि आयोगाने दिलेल्या डाटा मध्ये जिथे जिथे चुका असतील त्या दुरुस्त व्हावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. फुले – शाहू – आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या लोकांमागे आपण उभे राहिले पाहिजे. यासाठी महिलांनी देखील पुढाकार घ्यावा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज झालेल्या या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, समर्पित आयोगाचे सदस्य महेश झगडे, माजी आमदार पंकज भुजबळ यांचे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शिवाजीराव नलावडे, सदानंद मंडलिक, रविंद्र पवार, प्रा.दिवाकर गमे, दिलीप खैरे, ॲड. सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, मकरंद सावे, मंजिरी घाडगे, कविता कर्डक, वैष्णवी सातव, कविता खराडे, कविता मुंगळे, डॉ.डी. एन. महाजन, मोहन शेलार, संतोष डोमे, प्रा ज्ञानेश्वर दराडे, प्रा नागेश गवळी, समाधान जेजुरकर, तसेच राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.