Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येतील असा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आपलं मत मांडलं होतं. तेव्हा त्यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला होता. एवढंच नाही तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह असून एक मतप्रवाह सांगतो की आम्ही (अजित पवार गट व शरद पवार गट) पुन्हा एकत्र यायला हवं. मात्र, दुसरा मतप्रवाह सांगतो की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाता कामा नये, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, शरद पवार यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केलं आहे. तसेच ‘काही लोकांच्या इच्छा असू शकतात. इच्छा नाहीत असं नाही’, असं छगन भुजबळ यांनी आज (१६ मे)माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार आणि अजित पवार) एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी छगन भुजबळ यांना विचारला. यावर ते म्हणाले की, “मला तरी वाटतं अशी काही चर्चा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्ट सांगितलं की अशा काही चर्चा नाहीत. त्यापुढे त्यांनी काही स्टेटमेंट केलेली आहेत. त्यामुळे त्यामध्ये फार (दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत) काही तथ्य आहे असं वाटत नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
‘काही लोकांच्या इच्छा…’
“दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काही लोकांच्या इच्छा असू शकतात. इच्छा नाही असं नाही. मात्र, तशी काही चर्चा नाही किंवा तसा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भातील सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
महापालिका स्वबळावर लढवण्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असा नारा महायुतीतील पक्षामधून दिला जात आहे. मग याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, “याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत. पण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढू शकतात”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या दोन्ही शक्यता वर्तवलेल्या आहेत. आम्ही एकत्र आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. विधानसभेला अनेक ठिकाणी महायुतीच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील असं काही ठिकाणी होऊ शकतं. कारण प्रत्येक कार्यकर्त्यांची देखील इच्छा असते”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.