राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आज पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेधही केला होता. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाईफेक करणारे कार्यकर्ते हे समता परिषदेचे होते अशी माहिती समोर येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “ते कार्यकर्ते कोणाचे होते याबाबत मला काही माहिती नाही, परंतु हे स्वाभाविक आहे की ते फुले-शाहू-आंबेडकरांचे अनुयायी, कार्यकर्ते निश्चितपणे असणार. मागील काही दिवसांपासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाईंचं, महात्मा फुले आणि आता परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात सातत्याने काही चुकीची जी वक्तव्ये आहेत, मंत्री किंवा इतर ज्येष्ठ नेते करत आहेत. त्यामुळे या वर्गात राज्यात फार असंतोष निर्माण झालेला आहे. आपण पाहत आहोत, ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत, निषेध होतो आहे.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.
हेही वाचा – चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
याशिवाय, “माझं म्हणणं एवढच आहे की, देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की, महापरुषांच्या बाबतीत बोलताना शब्द अतिशय जपून वापरण्याची आवश्यकता आहे. कोणाचा अपमान होणार नाही, कुणाची मनं दुखावणार नाहीत, त्यांच्या अनुयायांना राग येणार नाही, असं आपण बोलताय कामानये. चुकीची सातत्याने विधानं केल्याने एकुणच वातावरण थोडसं गरम आहे आणि परत अशी काही विधानं केली जातात.” असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
हेही वाचा – चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’
याचबरोबर, “माझं सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी माफी मागितलेली आहे. मला असं वाटतं एवढ्यावर आपण थांबलं पाहिजे किंवा ज्यांना काही अजून करायचं आहे त्यांनी लोकशाही मार्गाने करावं. आपली मतं मांडावीत परंतु कोणाला इजा होईल, असं काही करता कामानये. एवढंच माझं फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे आणि नेत्यांना सांगणं आहे की आपण जरा जपून भाषणं करूया.” असंही शेवटी छगन भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं.