छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. त्यासाठीची सगळी तयारी झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने ही वाघनखं आणली जाणार आहेत. मात्र ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच आणली जात आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
“छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कायमस्वरुपी आणण्यासाठी आम्ही ब्रिटन सरकारला प्रस्ताव दिला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने शिवरायांशी संबंधित ज्या पवित्र वस्तू आहेत त्या परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा ते एक वर्षासाठी म्हणाले होते आता ते तीन वर्षांसाठी देत आहेत. आपला प्रयत्न असा आहे की ती वाघनखं कायमस्वरुपी इथे यावीत. या बदल्यात वाघाची एक जोडी आम्ही तुम्हाला देऊ. वाघनखांबाबत प्राथमिक चर्चेतून निर्णय होईल. छत्रपती शिवरायांची जगदंब तलवारही आणण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.”
हे पण वाचा- “महाराजांची वाघनखं आणताय त्यासाठी अभिनंदन, जमलं तर…”, नाना पाटेकरांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला टोला
वाघनखं भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील
छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात कायमस्वरुपी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याआधी कुणीही प्रयत्न केला नाही. आम्ही केला, आमच्या प्रयत्नांना यश आलं. सध्या तीन वर्षांसाठी वाघनखं येत आहेत. ती कायमस्वरुपी आणण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु. अशी माहितीही राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
छत्रपती शिवरायांची जी वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत ती खरोखरच छत्रपती शिवरायांची वाघनखं आहेत का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी आजच उपस्थित केला. छत्रपती शिवरायांची वाघनखं आणणार असं सरकारकडून सांगण्यात येतं आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर वाघनखांविषयी माहिती घेतली. त्यात म्हटलं आहे की वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली नाहीत. ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का? हे सांगा असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आता ही वाघनखं तीन वर्षांसाठीच आणली जात आहेत हे कळल्यानंतर विरोधकांच्या हाती आयता मुद्दाच मिळाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरुन कशी टीका होते आणि सरकार त्यांना कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.