सुमारे ३८८ वर्षांपासून सुरू असलेल्या चिमूर घोडायात्रा सुरू झाली असून रात्री रथयात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीहरी बालाजी महाराजांच्या जयघोषाने चिमूरनगरी दुमदुमली.
अश्वारूढ लाकडी रथावर श्रीहरी बालाजी महाराजांची प्रतिमा आणि महाराजांचे चार सैनिक, यासह रंगीबेरंगी रोषणाई, आतषबाजीच्या झगमगाटाने मंदिर परिसरातून रात्री घोडारथ यात्रा निघाली. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या शिर्डीच्या साईमंदिराची पूजा आदिवासी राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, खासदार नेते, आमदार भांगडिया यांच्या हस्ते करण्यात आली. टाळ्या, मृदंग, दिंडी, पताका, पारंपरिक रोषणाईसाठी वापरण्यात येणाऱ्या टेंभ्यापासून ते गोंविदाच्या जयघोषात घोडारथ यात्रा रात्रभर मार्गक्रमण करीत मंदिरासमोर पहाटे स्थानापन्न झाली. शेकडो भाविक चिमुरात आले आहेत. आजपासून खऱ्या अर्थाने यात्रा सुरू झाली आहे. महाशिवरात्रीपर्यंत ही यात्रा चालणार आहे. चार फेब्रुवारीला गोपालकाळा होतो. मुख्य यात्राही भरते. तेव्हाही लाखो भाविकांची उपस्थिती असते.