अहिल्यानगर : ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा व त्यांची आमदारकी रद्द करा, या मागणीसाठी गुरुवारी ख्रिश्चन समाजाने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले की, पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ख्रिश्चन धर्मगुरूंना मारणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. हा प्रकार संविधानावर आघात करणारा आहे.
धर्मांतराच्या कथित प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे. संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपीस शिक्षा व्हावी ही ख्रिस्ती समाजाची मागणी आहे. परंतु त्या घटनेचे भांडवल करून एकूण ख्रिस्ती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे गैर आहे. नगरमधील धर्मांतरविरोधी जनआक्रोश मोर्चातील फलकावरील मजकुराने ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो.