Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारने आज मोठी घोषणा करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. याबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत ही घोषणा केली आहे.

दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबात मोठं भाष्य केलं आहे.’आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं जास्त महत्वाचं आहे,असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच सरकार कर्जमाफीच्या आश्वासनापासून कुठेही दूर गेलेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण करणारच आहोत. मात्र, उद्धव ठाकरे हे नेहमी सांगतात की त्यांनी कर्जमाफी केली, त्यांनी कर्जमाफी केली. पण तुम्हाला सांगतो की महात्मा फुले ही कर्जमाफी योजना त्यांनी (महाविकास आघाडी सरकारने) केली होती. तेव्हा त्यांनी २० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. मात्र, त्याआधी आमच्या सरकारने म्हणजे मी आधी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी केली होती. तेव्हा १८६६२ कोटी आणि नंतर १९०० कोटी म्हणजे जवळपास २० हजार कोटींची कर्जमाफी आम्ही देखील तेव्हा केली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे यांनी काहीतरी वेगळं केलं असं काही नाही, आम्ही देखील कर्जमाफी केली होती. उद्धव ठाकरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यांना फुटकी कवडीही त्यांनी दिली नाही. पण जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही जवळपास ५ हजार कोटी दिले. त्यामुळे आम्ही आता देखील आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही. पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं जास्त महत्वाचं आहे. कारण कर्जमाफी केली तरी ज्याची जमीन खरडून गेली तो शेतकरी माती कुठून आणणार? त्यामुळे कर्जमाफीबाबत आम्ही कुठेही मागे हटलेलो नाहीत, आम्ही कर्जमाफी देखील करू, आज थेट मदत करणं गरजेचं असल्याने आम्ही थेट मदत करत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.