Today’s Top 5 Political Happenings In Maharashtra: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तत्पूर्वी वेगवेगळे पक्ष, त्या पक्षांचे नेते मोर्चेबांधणी करू लागले आहेत. यादरम्यान विविध पक्षांमधील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का?

महाविकास आघाडीत येण्यासाठी राज ठाकरे इच्छुक आहेत का? या प्रश्नाला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहेय “महाविकास आघाडीत जर एखादा नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे. काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या येथील नेतृत्वाला मोठा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीत निर्णय घेतील, त्यानंतर आम्ही सर्व महाराष्ट्रात आहोत आम्ही येथे निर्णय घेऊ”, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला असता राऊत म्हणाले, “आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो. स्वत: राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील बरोबर घेणं गरजेचं आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण त्यांचा (राज ठाकरे यांचा) हा निर्णय नाही”, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

स्वबळावर निवडणुक लढवण्याबाबत फडणवीस काय म्हणाले?

निवडणुक स्वबळावर लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युती करण्यासंदर्भात आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. पण, ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे युती केली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तरी मित्र पक्षांवर टीका करू नये, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.

महायुती म्हणून या निवडणुकांमध्ये चांगले यश तीनही पक्षांना मिळेल, हा विश्वास आम्हाला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते. परंतु, स्थानिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. केवळ सगळ्यांना निवडणूक लढता यावी, एवढा मर्यादित निर्णय घेता येणार नाही, ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षांसोबत युती करूनच निवडणूक लढविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संघावर बंदी घालणाऱ्या इंदिरा गांधींना सत्तेतून….

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्रियांक खरगे हे प्रसिद्धीकरिता असल्या गोष्टी करत असतात. त्यांना काहीच स्टैंडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे आहेत. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की, अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, नव्हे बंदी घातली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.”

शिंदेंनी सुरू केलेल्या आठ योजना फडणवीसांनी बंद केल्या?

शिवसेनेचे (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी आठ योजनांची यादी जाहीर केली आहे, ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने चालू केल्या होत्या. मात्र, या योजना आता बंद करण्यात आल्या आहेत असा दावा दानवे यांनी केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दानवे म्हणाले, “सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..

१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!

योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.”

एकनाथ शिंदेंचं नाव मोठ होऊ नये म्हणून योजना बंद केल्या?

एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस सरकारने बंद का केल्या असाव्यात याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मतदान मिळो आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे. फक्त मतदान मिळवण्यासाठी या योजना महायुती सरकारने आणल्या होत्या. लाडकी बहिण योजनेत २८ लाख महिलांचे नाव आता कमी केले आहे. धार्मिक पर्यटन योजना, शिक्षणासंबंधी काही योजना, आनंदाचा शिधा ही योजना बंद केली. याला दोन प्रमुख कारणं असतील एक, लोकांचा वापर करून हे लोकांना विसरले आहेत. दुसरं एक कारण असू शकतं, सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दाम नको असाव्यात. कारण या योजना आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता. ते स्वत: त्याकाळात मुख्यमंत्री होते. या योजना अशाच सुरू राहिल्या तर एकनाथ शिंदेंचं नाव अजून मोठं होईल, असं कदाचित भाजपाच्या नेत्यांना वाटत असावं,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.