मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पूरपरिस्थितीमुळे घराघरांत पाणी तर शिरलंच आहे, पण त्याचबरोबर शेतीमध्ये पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

१७५.५ मिमी पाऊस पडला आहे. जो सरासरीच्या १०२ टक्के इतका आहे. बीड मध्ये मदत आणि बचावकार्य सुरु आहे. धाराशिवमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. लोकांना आपण स्थलांतरित केलं आहे. अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. ही मागणीही पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. बीड, परभणी आणि जळगाव या भागात अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या कार्यरत आहेत.

राज्यातील ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करुन मदतीचे आदेश दिले आहेत. ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार कोटींहून अधिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पुढच्या आठ ते दहा दिवसांत पैसे जमा होती. अद्यापही हे थांबलेलं नाही. पंचनामे करुन मदत करणं हे ऑनगोईंग राहणार आहे. एखाद्या जिल्ह्यात कमी मदत दिसली तरीही ते नंतर वाढणार आहे कारण जशा गोष्टी समोर येत आहेत तशी मदत करणं सुरु आहे. मृत्यू किंवा दुर्दैवी घटना घडल्यास जिल्हाधिकारी स्तरावर मदतीचे आदेश दिले आहेत. पुरामुळे जी घरांची हानी होते त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती आहे ते आम्ही पाहिलं आहे. पालक मंत्र्यांनाही पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यास सांगितलं आहे. मी देखील काही जिल्ह्यांना भेट देणार आहे. अति पावसामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्यावर आमचा भर आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते आहे त्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते आहे त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की जी काही नियमांमध्ये आहे ती मदत आम्ही सुरु केलं आहे. सुरेश धस यांनी जे पत्र दिलं आहे त्यावर सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. केंद्र सरकारची मदत घेऊ. पण राज्य सरकार थांबणार नाही. आपल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत. आत्तापर्यंत २२१५ कोटी रुपयांची मदत आम्ही केली आहे. त्यातले १८२९ कोटी रुपये पोहचले आहेत. बाकी रक्कम आठ ते दहा दिवसांत होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तातडीची मदतही आपण करतो आहे. ज्यांचं स्थलांतर केलं आहे त्यांच्या राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था सरकारने केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.