राज्यामध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेसुद्धा त्यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करताना दिसत आहेत. याच आरोपांवर आता बंडखोरांचे नेतृत्व करणारे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. योग्य वेळी आपण खंजीर कोणी खुपसला याबद्दल बोलूच असं सांगताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

नक्की पाहा >> Photos: …अन् आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडली; नंतर त्यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटलं, “सात वर्षात एकदाही…”

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी उद्धव यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. “खंजीर खुपला, खंजीर खुपसला हे जे काही वारंवार बोललं जात आहे मी त्यावर असं बोलू शकतो की, जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये अडकलेत त्यांनी खंजीर खुपसल्याबद्दल बोलणं योग्य वाटत नाही. पण खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला हे योग्य वेळ आल्यावर नक्की बोलेन,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. “आज बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा कोणी केली, हे सर्वश्रूत आहे. निवडणुकीच्या वेळी एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता तर दुसरीकडे मोदींचा फोटो होता. ज्यांच्याबरोबर आपण निवडून आलो. लोकांनी जे जनमत दिलं ते तोडून मोडून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावर सर्व आमदारांना आक्षेप आहे. म्हणूनच आम्ही ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतलीय,” असं शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनगर समाजाच्या मेळाव्यामध्येही शिंदे यांनी आम्ही बंडखोरी नाही क्रांती केली असल्याचं विधान केलं. या भाषणामध्येही त्यांनी भाजपा आणि शिवसेना ही निवडणुकपूर्व नैसर्गिक युती होती. ती सोडून स्थापन केलेल्या सरकारविरोधात क्रांती केल्याचा टोला लगावला.