scorecardresearch

Video: “मी पालघरला प्रचारासाठी निघालो तेव्हा आई आजारी होती, डॉक्टरचा फोन आला…”, एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

एकनाथ शिंदे म्हणतात, “…एवढं करून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? पण मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही!”

eknath shinde khed rally speech
एकनाथ शिंदेंचा खेडमधील सभेतून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल! (फोटो – खेड सभेतून साभार)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खेडमधील सभेची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. त्यात ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमध्येच झालेल्या सभेतून शिंदे गटावर टीकास्र सोडलं होतं. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदें उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. आज खेडच्या सभेत केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला वाऱ्यालाही उभं केलं नाही, त्याच बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी २०१९च्या निवडणुकीत घडलेला एक प्रसंग उपस्थितांना सांगितला.

“मला मर्यादा सोडायला लावू नका”

मर्यादा सोडायला लावू नका, असा इशारा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. “माझ्याकडे खूप काही आहे. पण मी बोलत नाही याचा अर्थ मला काही माहिती नाही असा कुणी घेऊ नये. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. त्यापलीकडे माणूस गेल्यानंतर सगळे बांध तुटून जातात. ती वेळ आमच्यावर आणू नका एवढंच सांगतो”, अशा शब्दांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

२०१९चा ‘तो’ प्रसंग!

आपल्या भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंनी २०१९चा एक प्रसंग सांगितला. एवढं करूनही तुम्ही आम्हाला गद्दार कसं म्हणता? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. “२०१९च्या निवडणुकीवेळी माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मी पालघरला राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी निघालो होतो. तेवढ्यात मला डॉक्टरचा फोन आला. माझ्या मनात तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली. गावित मला म्हणाले की माझी सगळी तयारी झाली आहे, सभेला जाणं आवश्यक आहे. मला सगळं माहिती असूनही मी डॉक्टरला सांगितलं की संध्याकाळी येतो. आई जवळपास गेली होती. पण मी राजेंद्र गावितांची सभा सोडून आलो नाही. त्यांची सभा पूर्ण करून रुग्णालयात पोहोचलो”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“मर्यादा सोडण्याची वेळ आमच्यावर आणू नका, मी काही बोलत नाही याचा अर्थ…”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

“असं काम केलं, हा आमचा गुन्हा आहे? ते कर्तव्य पार पाडलं, हा आमचा गुन्हा आहे? कोविडमध्ये पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो हा आमचा गुन्हा आहे का? घरात बसून आदेश देण्याचं काम आम्ही केलं नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. या एकनाथ शिंदेला दोनदा करोना झाला. पण हा एकनाथ शिंदे मागे हटला नाही. एवढं करून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता? खोके म्हणता? पण मी कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही”, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी नमूद केलं.

“योगेश कदममुळे इतरांची डिपॉझिट जप्त होतील”

दरम्यान, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कामामुळे इतरांचं डिपॉझिट निवडणुकीत जप्त होईल, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. “एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकणासाठी मोठं प्राधिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. योगेश कदमचं प्रेम सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्याला पाडण्याची हिंमत कुणामध्ये नाहीये. तो पुढच्या दीड वर्षांत एवढं काम करेल, की समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 21:10 IST