शफी पठाण, लोकसत्ता

(राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी) वर्धा : महात्मा गांधी आणि विनोबांची कर्मभूमी अशी ओळख असलेल्या वर्धा शहरात विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्त उद्या शुक्रवारी ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणवर साहित्य नगरी सजली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास उपस्थिती राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी ८ वाजता ग्रंथिदडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षकांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन होणार आहे.  विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

दोन कोटींचे अर्थसहाय्य मंजूर

वर्धा येथे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने गुरूवारी दोन कोटी रुपये मंजूर केले. यापैकी ५० लाख रुपये २३ ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आले होते. उर्वरित दीड कोटींनाही मंजुरी देण्यात आली आहे.

मान्यवरांना पत्रिकांची प्रतीक्षा

पहिल्या दिवसापासून सुरू असलेला निमंत्रण पत्रिकेचा घोळ अद्याप संपलेला नाही. एकतर संमेलन आठ दिवसांवर आले तरी पत्रिका छापखान्यातून आल्या नव्हत्या. त्यानंतर पत्रिका वेळेत मान्यवरांपर्यंत पोहचल्या नाहीत. प्रसिद्ध कांदबरीकार विश्वास पाटील, ‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्यासह अनेकांना अद्याप पत्रिका मिळाली नसल्याने आपण संमेलनाला जायचे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.