पंढरपूर : राजकारणात आजपर्यंत एवढे गोंधळलेले विरोधक कधीही पाहिले नाहीत. मतदारयादीतील प्रश्नावरून पहिल्या दिवशी ते भलत्याच अधिकाऱ्यांना भेटले. हाच विषय घेऊन आज ते दुसऱ्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांना काय मागणी करावी, कुणाकडे करावी, कधी करावी हे सुद्धा कळत नाही. हा सगळ्या प्रकाराचा ‘फियास्को’ झाला आहे. हा बालिश प्रकार असून वास्तवापेक्षा निवडणुका जवळ आल्या, की वातावरण तयार करण्याचा भाग जास्त असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्यातील ही अपरिपक्वता, गोंधळ पाहूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज त्यांची सोबत करणे टाळले असल्याचा टोलाही फडणवीस यांनी या वेळी विरोधकांना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूर येथे आले होते. कार्यक्रम संपल्यावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, की मतदारयादीत काही आक्षेप असतील ती मांडण्याची एक पद्धत असते. यासाठीच मतदारयादी प्रसिद्ध केल्यावर हरकती, सूचना यासाठी एक वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र त्यावेळी काहीही करायचे नाही आणि नंतर उगाचच भेटीचे प्रदर्शन करत आरडाओरडा करायचा, असा प्रकार सुरू आहे.
बरं हे करताना सुद्धा कुठल्या अधिकाऱ्यांना भेटायचे हेही या एवढ्या मोठ्या, जाणकार नेत्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. कायदा काय सांगतो. घटनेने याबाबत कोणाला अधिकार दिले आहेत. याचीही त्यांना माहिती नाही. कदाचित यामुळेच त्यांच्यातील ही अपरिपक्वता, गोंधळ पाहूनच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज त्यांची सोबत करणे टाळले असल्याचा टोलाही फडणवीस यांनी या वेळी विरोधकांना लगावला.
निवडणुका चांगल्या वातावरणात व्हाव्यात. मतदारयादी सुधारण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. मुळात गेली २० वर्षांपासून खोटी नावे यादीत आहेत. आम्ही देखील हरकत घेतली होती. परंतु विरोधकांना सुधारण्यापेक्षा चुकीचे वातावरण तयार करण्यात जास्त रस आहे. आता त्यांनी आम्हाला आव्हान केले आहे. तर आम्ही तयार आहोत. मात्र ते सोडून केवळ गोंधळ घालणे सुरू आहे. हा सगळा प्रकार म्हणजे केवळ निवडणुका जवळ आल्या, की चुकीचे वातावरण तयार करण्याचा आहे. त्यामुळे त्यांच्या दोन दिवसांच्या चकरा म्हणजे केवळ ‘फियास्को’ असल्याची खिल्ली फडणवीस यांनी उडवली.
कोणाला कुठेही जाता येते
दरम्यान राज ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, कोणाला कुठेही जाता येते. पण एक लक्षात घ्या आगामी निवडणुकीत युतीचा विजय होणार आणि त्यानंतर हेच विरोधक छायाचित्रे दाखवून आम्ही हे केले ते केले, असे सांगत बसतील असे फडणवीस म्हणाले.