सांगली : घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानात विविध आजारांचे निदान झालेल्या ७१९ महिला रुग्णांवर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया व उपचार संपूर्णत: मोफत करावेत व त्यांचे आरोग्य जपण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियान आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय पाटील, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे चंद्रकांत साळुंखे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील समन्वयक सचिन पाटील, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयाचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांच्यासह धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांचे डॉक्टर्स व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान १४ मे रोजी घेण्यात आले. या अभियानात त्या दिवशी जिल्ह्यातील अडीच हजाराहून अधिक घरेलू कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७१९ महिला रुग्णांना विविध आजारांचे निदान झाले असून, त्यांना धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया व उपचार याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदर्भित महिला रुग्णांची आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करावे व त्यांना आजारातून मुक्त करावे, अशा सूचना करून जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, घरेलू कामगार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, या महिलांचा आरोग्य प्रश्न दुलर्क्षित न करता प्राधान्याने त्यांना आरोग्य सेवा द्यावी. बऱ्या झालेल्या रुग्णांचा २ ऑक्टोबरला आनंद मेळावा घेण्यात येणार आहे. याचा सांगली पॅटर्न व्हावा, यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.