कराड : पुणे-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये संपादित झालेल्या पार्ले, बाबरमाची, सयापूर, यशवंतनगर, शिरवडे या कराड तालुक्यातील जमिनीला बाजारभावाच्या पाचपट बागायती क्षेत्राप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. कराड येथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते बाधित मिळकतदारांना मोबदल्याचे धनादेश देण्यात आले. या मोबदल्यासाठी आंदोलन उभे करणारे शेतकरी नेते सचिन नलवडे या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाविरोधात लढा सुरू होता. शेतकऱ्यांना मोबदला न देता रेल्वे विभागाने विविध ठिकाणी कामे सुरू केली होती. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रेल्वेच्या हद्दीचे खांब उभे करण्यात आले होते. शेतकऱ्यांची जमीन आमचीच असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत होते. या वेळी शेतकऱ्यांना सोबत घेऊन सचिन नलवडे यांनी मोठा लढा उभा केला होता. रेल्वेची विना मोबदला सुरू असलेली कामे बंद पाडण्यात आली होती.

त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले, तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, भूसंपादन शाखेचे दिनकर ठोंबरे व रेल्वे अधिकारी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक होवून शेतकऱ्यांच्या जमिनी सातबाऱ्याप्रमाणे मोजण्याचे ठरले. त्यानुसार कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली. मोजणीमध्ये रेल्वेच्या प्रस्तावातील जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन रेल्वेसाठी संपादित होत असल्याचे निदर्शनास आले.

कराड तालुक्यातील गावातील सर्व शेतकऱ्यांना नुकतेच वाढीव क्षेत्रासह बागायती जमिनीप्रमाणे बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळाला आहे. जमिनीला पाच लाख, दीड लाख रुपये गुंठा प्रमाणे, तर बाधित होणाऱ्या फळ झाडांना पुढील पीक गृहीत धरून मोबदला मिळाला आहे. घर, शेड, विहीर यालाही शासन निर्णयानुसार चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत बोलताना सचिन नलवडे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले. हा प्रश्न माध्यमांनीही लावून धरला होता. प्रत्येक बाधिताला न्याय मिळेपर्यंत लढा राहील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation five times affected railway expansion ssh
First published on: 02-08-2021 at 00:40 IST