वाई : छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज हे राजकारणासाठी तडजोडी करतात. त्यांच्या या तडजोडी महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यात केली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे भाजपासोबत असलेल्या राजकीय संबंधांवर बोट ठेवत त्यांचे नाव न घेता राऊत यांनी वरील टीका केली.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपतींच्या वंशजांनी घराण्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा छत्रपतींच्या वंशजांवर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी साताऱ्यात शुक्रवारी रात्री कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वरील वक्तव्य केले. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता राऊत म्हणाले, की येथील छत्रपतींचे वंशज सध्या ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही.
परंतु या वंशजांना त्याचे काही नाही. ते त्यांच्या राजकारणासाठी तडजोड करतात. या तडजोडी महाराष्ट्राला अजिबात मान्य होणार नाहीत. जनता त्यांना उत्तर देईन. पूर्वी छत्रपती पेशव्यांच्या नेमणुका करत होते मात्र आता पंत छत्रपतींना नेमायला लागले आहेत, असेही राऊत या वेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी छत्रपतींच्या वशंजांनी घराण्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांची उमेदवारी नाकारण्यावरून वादाचा मुद्दा निर्माण झाला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा छत्रपतींच्या वंशजांवर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.