लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या सोलापूर लोकसभेच्या तुल्यबळ लढतीत प्रचाराने गती घेतली असली तरी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या अधिकृत प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राम नवमीचा मुहूर्त निवडला आहे. सर्व प्रमुख मंदिरांमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करताना मवाळ हिंदुत्वाची भूमिका जोपासण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राम नवमीला पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरासह अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर, हत्तूर येथील प्रसिध्द बनसिध्द मंदिर, मार्डीचे प्राचीन यमाई मंदिर, पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय मंदिर आदी ठिकाणी काँग्रेसच्या प्रचाराचे नारळ फोडले जाणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई बाजार समितीतील घोटाळ्यावरून हल्लाबोल, नरेंद्र पाटलांकडून शशिकांत शिंदे लक्ष्य

यापूर्वी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका लढविताना त्यांच्या प्रचाराचा नारळ मार्डीच्या यमाई मंदिरात किंवा हत्तूरच्या बनसिध्द मंदिरात फोडला जात असे. परंतु यंदा लोकसभेसाठी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राम नवमीचा मुहूर्त ठरविण्याबरोबरच मतदारसंघातील सर्व मंदिरांमध्ये नारळ फोडण्यात येणार आहे. यातून भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा ताकदहीन करण्याचा हेतू दिसून येतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.