“राज्यात राजकीय नाट्य घडून सत्तांतर होताना काय झाडी..काय डोंगार, काय हॉटेल…अशी चंगळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत केली. परंतु त्यांचं समदं ओकेमधी असलं तरी महाराष्ट्र ओकेमधी नाही.”, अशा शब्दात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्यातील नव्या सरकारवर टीका केली आहे.

शिवसेनेत बंडखोरी होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोबत घेऊन सरकार स्थापन करून महिना उलटला आहे. परंतु या नव्या सरकारला अद्याप मंत्रीमंडळ बनविताना आले नाही. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोनच मंत्र्यांवर सरकारचा कारभार चालत आहे. यासंदर्भात सोलापुरात भाष्य करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी नव्या सरकारच्या स्थैर्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

…परंतु इकडं महाराष्ट्र मात्र नॉट ओके झाला आहे –

“ राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका होताच सत्ताधारी शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले. तेथे त्यांना मौज करताना झाडी, डोंगर आणि हॉटेलची कुतुहल वाटले. त्यांच्यासाठी काय झाडी, काय डोंगार..काय हॉटेल असं सगळंच ओकेमधी झालं आहे. परंतु इकडं महाराष्ट्र मात्र नॉट ओके झाला आहे. ” अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी सेना बंडखोर आमदारांसह नव्या सरकारवर निशाणा साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दररोजच महागाईचा भडका –

तसेच, “एकीकडे केंद्र सरकारच्या सपशेल अपयशी आणि चुकीच्या धोरणांमुळे दररोजच महागाईचा भडका उडत आहे. त्याचा फटका घराचा गाडा ओढणा-या गृहिणींना बसत आहे. नागपंचमीसारख्या सणासुदीला पुरणपोळी बनविण्याचीही पंचाईत पडली आहे. गहू, तेल, गूळ, डाळी असे सर्व प्रचंड महागले आहेत. तेव्हा पुरणपोळी कशी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची, याचा दहावेळा विचार करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य जनता आज नॉट ओके मध्ये आहे. त्याची काळजी अस्थिर सरकारला कशी राहणार?” असा प्रश्नार्थक टोलाही आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला.