सोलापूर : एकीकडे गौरी गणपतीच्या सणात गोरगरीब रेशन कार्डधारकांना महायुती सरकारने जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा योजनेचा बोजवारा उडाला असताना दुसरीकडे काही रेशन दुकानांमधून रेशन कार्डधारकांना चक्क प्लास्टिक मिश्रित तांदूळ वाटप केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या माध्यमातून सरकार गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे बोल त्यांनी सुनावले आहेत. तथापि, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देताना रेशन धान्य दुकानातून वाटप केला जाणारा तांदूळ प्लास्टिकचा नसून तो फोर्टिफाईड तांदूळ असून आरोग्यास फायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा >>> “अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

खासदार प्रणिती शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत रेशन धान्य दुकानातून गोरगरीब रेशन कार्डधारकांना वाटप होणाऱ्या धान्यामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ दिला जात असल्याचा आरोप करीत त्याचे काही नमुने पत्रकारांना दाखविले. तसेच शिजवल्यानंतर हा तांदूळ कसा असतो याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखविले. अक्कलकोट तालुक्यातील आंबेवाडी येथील रेशन धान्य दुकानातून वाटप झालेल्या प्लास्टिक तांदळाची पाकिटे त्यांनी समोर ठेवली. हे प्लास्टिक तांदूळ शिजवून खाणे माणसेच काय जनावरांना देखील अपायकारक आहे. यात महायुती सरकार सामान्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >>> सातारा : मान्याचीवाडी अव्वलस्थानासह एक कोटीच्या बक्षिसाची मानकरी, ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्रिक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुती सरकारचे दिवस आता पूर्ण भरले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तथापि, रेशन धान्य दुकानातून वाटप होणारा तांदूळ प्लास्टिकचे नसून तो गुणसंवर्धित (फोर्टिफाईड) असून आरोग्याला फायदेशीर असल्याचा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२३ पासून गुणसंवर्धित (फोर्टिफाईड) तांदळाचे वितरण केले जात आहे. गुणसंवर्धित तांदूळ तांदळाच्या पिठापासून बनवलेला असतो. यात आरोग्यासाठी आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात. तांदळाची भुकटी तयार करून त्यात लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी-१२ चे सूक्ष्म अन्नद्रव्य असून आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. शरीरात पोषक तत्त्वांचे घटक कमी असतील तर हा तांदूळ खाल्ल्याने पोषणतत्त्वांची कमतरता दूर होण्यास मदत होते, असा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केला आहे.