“योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; काँग्रेस नेत्याचा सवाल

सत्यजीत तांबे यांनी केलं ट्विट

संग्रहित (Photo: PTI)

महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा बाहेर आली आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्याच फोटोंना स्थान देण्यात आल्यानं, “ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची?,” असा सवाल काँग्रेस इतर दोन्ही मित्र पक्षांना केला आहे.

काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या चर्चेनं फेर धरला होता. मात्र, त्यावर नंतर पडदा पडला. ही चर्चा थांबत नाही, तोच महाविकास आघाडीतील काँग्रेसनं पुन्हा एकदा इतर दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करून ही नाराजी बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या महाजॉब्स पोर्टलची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते असून, त्यावर काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केला आहे.

“महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचं गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे,” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे.

मागील महिन्यात काँग्रेसनं उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही मागितली होती. त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress raised question is this scheme of shivsena and ncp bmh