कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार बोगस मतदान झाल्याचा दावा करताना, काँग्रेसचे इतर मागासप्रवर्ग शाखेचे (ओबीसी सेल) प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे सर्व मतदान रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही भानुदास माळी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातील कापील (ता. कराड) येथे गावाशी कोणताही संबंध नसणाऱ्या नऊ जणांनी मतदान केले असून, हे मतदान बोगस असल्याचा दावा करीत त्याविरुध्द कापिलचे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी कराड तहसीलदार कचेरीसमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या आज मंगळवारी सहाव्या दिवशी काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा देत प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना बोगस मतदानासंदर्भात निवेदन सादर केले. माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे, प्रदीप जाधव आदींची उपस्थिती या वेळी होती.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना माळी पुढे म्हणाले, बोगस मतदानासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमच्या प्रश्नांवरील त्यांची उत्तरे समाधानकारक नव्हती. बोगस मतदानाचा घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, या प्रश्नावर ते चकार शब्द बोलत नाहीत. त्यांनी यासंदर्भात भाजप प्रवक्त्यासारखी उत्तरे दिली. कराड दक्षिणमध्ये शिराळा, वाळवा, तसेच पाटण तालुक्यातील मतदारांची नावे आहेत. अशा प्रकारच्या मतदान नोंदणीवर गुन्हे दाखल करावेत, या मूळ मागणीवर प्रांताधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र, त्यांनी आमची मागणी मान्य करून चौकशीअंती संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माळी यांनी केली.

कापील येथील बोगस मतदानासंदर्भात गणेश पवार यांच्या तक्रार अर्जावर २५ तारखेला सुनावणी आहे. त्यात जो निर्णय होईल, त्यावरून पुढे आमची भूमिका ठरवणार आहोत. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे गणेश पवारांनी आम्हाला सांगितले आहे. त्यांच्या उपोषणास सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा जाहीर पाठिंबा असल्याचे भानुदास माळी यांनी या वेळी सांगितले.