रत्नागिरी: जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीने सोडलेल्या पाण्यामुळे मासे मृत झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती. याचीच पुनरावृत्ती पुन्हा नांदिवडे समुद्रकिनारी झाल्याचे दृश्य येथील जागरूक मच्छीमार, त्रिमुर्ती मच्छीमार सहकारी संस्थेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ शिवसैनिक श्री. जयवंत गजानन आढाव, श्री . संतोष सीताराम हळदणकर, श्री.देवीदास श्रीरंग हळदणकर यांनी समोर आणली आहे.

मासे मृत झाल्याची घटनेची माहिती त्यांनी जेएसडब्ल्यू एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी नरेश विलणकर यांना कळविण्यात आली. नरेश विलणकर यांनी नांदिवडे समुद्र किनाऱ्याला भेट देवून याची पहाणी केली. या मूर्त झालेल्या माशां मध्ये १० ते १५ किलो वजनाचे मोठे मोठे मासे यामध्ये गोबरे तसेच तावीज, पालू व शितकं असे मासे होते. जिंदालच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून घाणेरडे विषारी पाणी नांदिवडेच्या समुद्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अजिबात लक्ष नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र झालेल्या प्रकाराबद्दल स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. जयवंत गजानन आढाव व सहकारी मच्छीमारांनी या विरोधात जन आंदोलन उभे करण्याचा इशारा कंपनीला दिला आहे.

जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनी अशा पद्धतीने स्थानिक मच्छीमारांच्या भविष्याच्या उपजीविकेवर घाला घालत असल्याचा आरोप येथील स्थानिक मच्छिमार लोकांकडुन करण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, असे सर्व स्थानिक मच्छीमारांनी व जनतेने मत व्यक्त केले आहे. याबाबत लवकरच शासन दरबारी आवाज उठवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

नांदीवडे येथे घडलेल्या या प्रकाराबाबत अद्याप ही कंपनीने स्पष्टीकरण दिले नाही. मात्र पहाणी केल्या नंतर जेएसडब्ल्यू एनर्जीचे जनसंपर्क अधिकारी नरेश विलणकर यांनी याविषयी चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.