करोना विषाणुंमुळे बाजारपेठांबंद झाल्याने  हॉटेल- कॅन्टीन व खाद्य पदार्थांची दुकाने बंद असल्याने तसेच वाहतुकीच्या समस्या असल्याने मिरचीच्या मागणीमध्ये मोठी घसरण आली आहे. मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे झाडावरील मिरच्या पुरेशा प्रमाणात वेचल्या जात नसून या हिरव्या मिरच्या आता लाल पडत आहेत. एकीकडे मिरचीला बाजारात अपेक्षित दर मिळत नसताना वेचलेल्या मिरच्यांची विल्हेवाट लावणे ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर समस्या आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे अठराशे हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी ७० ते ८० टक्के पीक वाया गेल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पालघर- ७४७ हेक्टर,  डहाणू – ७८५ हेक्टर, तलासरी – ८१ हेक्ट व वाडा येथे ४२  हेक्टर असे जिल्ह्यातील मिरची लागवड क्षेत्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात डहाणू, पालघर, तलासरी, वाडा या तालुक्यात प्रमुख्याने मिरचीची लागवड करण्यात येत असून येथील शेतकरी ईगल, इंदू एक नंबर, नामधारी तसेच जी- 4 या तिखट प्रजातीच्या मिरच्याची लागवड करताना दिसतात. मिरचीच्या लागवडीसाठी तसेच त्यावर खतं व किटकनाशक फवारणीसाठी सरासरी 20 रुपये प्रति किलो इतका खर्च होत असून तयार झालेल्या मिरची वेचण्यासाठी सध्या या भागात पाच ते सात रुपये प्रति किलो एकी मजूरी मोजावी लागत आहे. शिवाय गोणी मध्ये बांधण्याचा खर्च सरासरी एक रुपया प्रति किलो इतका येतो.

संचारबंदी पूर्वी जिल्ह्यातील तिखट मिरचीला सरासरी 35 ते 40 रुपये प्रति किलो इतका दर प्राप्त होत असे. मात्र करोना विषाणूच्या संसर्गामुळे मिरचीच्या निर्यातीवर बंदी आली असून राज्यभरात खाद्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. सध्या मुंबईतील घाऊक बाजारपेठ मर्यादित स्वरूपात कार्यरत असल्याने येथील व्यापारी टेम्पोमधून उपनगरातील किरकोळ बाजारामध्ये येथील मिरची पाठवत आहेत. मिरचीच्या विक्रीला आवश्यक बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने सध्या येथील शेतकऱ्यांना दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो इतकाच बाजारभाव आहे. मिरचीच्या विक्रीमधून व्यापार्‍यांची कमिशन, हमाली व वाहतूक खर्चाचा समावेश असल्याने शेतकऱ्यांच्या हातामध्ये मजुरीचा खर्च देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उत्पादित केलेली मिरची मुंबई बाजारपेठेत पाठवण्यासाठी लागणारा खर्च विक्रीतून निघत नसल्याने मुंबई बाजारपेठेमध्ये पालघर मधून दररोज तीन ते चार ट्रक मिरची पाठवण्याचे येथील शेतकऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे विक्री न होणारी मिरची सुकवून ठेवण्यापलीकडे दुसरा पर्याय शेतकऱ्यांना नाही. शिवाय मनुष्यबळाच्या मर्यादा असल्याने अनेक झाडांवर मिरच्या सुकलेल्या अवस्थेमध्ये असल्याचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची मागणी आमदार मनिषा चौधरी, आमदार कपिल पाटील आदींनी पत्राद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांची मुद्दल देखील विक्रीमधून मिळत नाही –

पालघर व परिसरामध्ये तिखट मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. मात्र मिरचीचे बाजार भाव गडगडल्याने तसेच उचल नसल्याने मिरची सुकत असल्याने शेतकऱ्यांची मुद्दल देखील विक्रीमधून मिळत नाही.  असे पालघर येथील शेतकरी  अजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus chilli growers in crisis in palghar district msr
First published on: 08-04-2020 at 15:06 IST