करोनाच्या दुसऱ्या लाटेनं केंद्र आणि राज्यातील आरोग्य यंत्रणांची झोप उडवली. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यानं राज्यांनी निर्बंधाचाची साखळी आवळण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रातही १४ एप्रिलपासून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे. मात्र, त्यानंतर चित्र कसं असेल, असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दुसरीकडे लॉकडाउन वाढवण्याकडेच इतर राज्यांचा कल दिसून येत असून, आज झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंदर्भात सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील काही राज्यांत करोनाच्या दुसऱ्या संसर्गाची लाट कमी होताना दिसत असली, धोका कायम आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतील नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मात्र, मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. त्यातच करोनाचं नवीन म्युटेंट लहान मुलांसाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्यबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात लहान मुलं आणि बालकांमधील कोविड संसर्ग रोखण्यासाठी बाल रोगविषयक निर्माण करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री म्हणाले,”“पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झाला. सध्या दुसरी लाट आहे. ज्यात आपण अनुभवतोय की युवा आणि मध्यमवयीन नागरिकांना संसर्ग होत आहे. आता मुलांचा वर्ग राहिलेला आहे आणि त्याच्यात ही लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता वर्तवल्यानंतर आपण शांत बसणं हे काही शक्य नाही. करोनाविरोधातील लढण्यासाठी सर्वाधिक तयारी महाराष्ट्राने केली आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”राज्यात करोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.

१८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण… मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

“करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, पण नागरिकांनी घाबरू नये. घाबरण्याचं कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. सध्याच्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यावर सोपवलेली आहे. महाविकास आघाडी सरकारची सहा कोटी नागरिकांसाठी दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी आहे. मात्र दुर्दैवाने अजुनही लस पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण काही दिवसांसाठी स्थगित करावं लागलं,” अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid crisis in maharashtra cm uddhav thackeray special program on prevention of covid in children maharashtra covid task force bmh
First published on: 23-05-2021 at 13:45 IST