शरद पवारांवर बोलणार्‍या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल केलेल्या टिप्पणीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांविरोधात तक्रार नोंदवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांने केले आहे.

“शरद पवार आता देवेंद्र फडणवीसांना काशीचा घाट दाखवणार आहेत असे नवाब मलिक म्हणाले. काशीचा घाट म्हणजे मृत्यू. तुम्ही बंदुका घेऊन फिरत आहात काय? शरद पवारांनासुद्धा पाच वर्षे मुख्यमंत्री राहता आले नाही. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तो पराक्रम केला आहे. देवेंद्र फडणवीसांना नवाब मलिक काशीचा घाट दाखवणार आहेत. देवेंद्र फडणवीसांना काही बरे वाईट झाले तर त्याची सूत्रे नवाब मलिकांकडे जात आहेत अशा प्रकारची एक सावधगिरीची तक्रार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे, अशी सूचना पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिली.

“शरद पवारांनी फडणवीसांना ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आणि आता..”; नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

“नवाब मलिक स्पष्टपणे बोलले आहेत. पण तक्रार मलिकांवर दाखल करावी लागेल. मृत्यूनंतर काशी घाटावर विधी झाले की स्वर्ग मिळतो असे म्हणतात. आमच्या कार्यकर्त्यांना रोज काँग्रेस शिवसेना काम देत आहे. आंदोलन केल्यानंतर तुम्ही अटक कराल. गेल्या दोन वर्षात तुम्ही एकही प्रकरण जिंकलेले नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आणि शरद पवारांच्या बाबतीत भाष्य करत आहेत. कालपर्यंत त्यांच्या पक्षाच्या २५ ते ३० जागा निवडणून येत होत्या. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस कधी विधानसभेमध्ये निवडणून आले नाहीत. ते आम्हाला साडेतीन जिल्हाच्या पक्ष म्हणत आहेत तर इतर जिल्ह्यात आमचे जे आमदार आहेत ते कुठल्या जिल्ह्यातील आहेत याची माहिती त्यांनी घ्यावी. भाजपाला शरद पवारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. आता असेच ते भाष्य करत राहिले तर काशीचा घाट दाखवण्याचे कामही शरद पवार करतील,” असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.