मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचं निमित्त साधून राज्य मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजी नगरमध्ये बैठक होते आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी पोहचले आहेत. या बैठकीवर सामनाच्या अग्रलेखातून कडाडून टीका करण्यात आली आहे. हा सगळा फसवणुकीचा अमृतकाल आहे असंही सामनातून म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होते आहे. कॅबिनेट बैठकीच्याआधी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवून घेतलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत त्यांनी सरकारला तीस दिवसांची मुदत दिली असून उपोषण सुटले तरी आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र दोन उपमुख्यमंत्री गेले नाहीत. संभाजीनगरमधल्या बैठकीत कुठलेच अडथळे नकोत, सरकारी वाहनांवर हल्ले नकोत म्हणून सरकारने वेळ मारुन नेली आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे. मंत्रिमंडळ बैठकीचे सोपस्कार पाडले जातात, पण हातात काहीच लागत नाही.

फसव्या घोषणांचा विषाचा प्याला

आता मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून ही बैठक घेतली जाते आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातले ६८५ शेतकरी फक्त मराठवाड्यातले आहेत. बीड जिल्ह्यात किमान २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या काळातले हे चित्र विदारक आहे. मोदी हे स्वातंत्र्याचा अमृतकाल त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत. मात्र जनतेसाठी अमृत कमी व फसव्या घोषणांचा विषाचा प्यालाच मराठवाड्याच्या बाबतीत त्यापेक्षा वेगळं काय आहे? त्याच घोषणा आणि तीच फसवणूक.

फडणवीसांच्या घोषणांचं काय झालं?

देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी घोषणांची बरसात केली. आता बेकायदेशीर मुख्यमंत्री श्रीमान मिंधे तेच करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१६ मध्ये त्यांनी संभाजीनगरात मंत्रिमंडळात बैठक घेऊन साधारण ५० हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांचे काय झालं? असाही सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचं निमित्त आणि बाता मराठवाड्यातल्या दुष्काळावर फुंकर वगैरे मारण्याच्या असल्या तरी बैठकीचा थाटमाट राजेशाहीच आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आणि दुष्काळ राहिला बाजूला सरकारने आपल्या राजेशी थाटाचेच दर्शन मराठवाड्याला घडवले. आज मराठवाड्यात मुख्यमंत्री येतील आणि झेंडा फडकवून निघून जातील. मराठवाडी जनता मात्र पुन्हा एकदा फसवणुकीच्या ओझ्याखाली चिरडून जाईल.