सावंतवाडी : सावंतवाडीच्या मोती तलावात गेली काही दिवस नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. तब्बल पाच दिवसांच्या प्रयत्नांनंतर, वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाच फुटांच्या या मगरीला पकडण्यात यश आलं आहे. त्यामुळे, गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळी निर्माण झालेलं संकट आता टळल्याने सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेले पाच दिवस वनविभागाने मगरीला पकडण्यासाठी सापळा लावला होता, पण ती सापळ्यात अडकत नव्हती. अखेरीस, आज पिंजऱ्यात कोंबडीचा वापर करण्यात आला. कोंबडी हलवल्याने मगर त्याकडे आकर्षित झाली आणि ती अलगद पिंजऱ्यात अडकली. मगर पकडल्याची बातमी कळताच मोती तलावाच्या काठावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या मगरीमुळे गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. संगीत कारंज्याजवळ ती वारंवार दिसून येत असल्याने मगरीला पकडण्याची मागणी जोर धरू लागली होती. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, आणि रेस्क्यू टीमचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी झाली. वनक्षेत्रपाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या मागणीनुसार या मगरीला पकडण्यात आलं आहे. आता तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांनी सांगितलं की, ही त्यांनी रेस्क्यू केलेली ३६४ वी मगर आहे. तलावातील पाण्याचा जास्त साठा असल्यामुळे मगरीला पकडण्याचं काम एक मोठं आव्हान होतं, पण आज अखेर ते यशस्वी झालं आहे. वनविभागाच्या या कामगिरीचं नागरिकांनी कौतुक केलं असून, आता विसर्जन शांतपणे पार पडेल अशी आशा व्यक्त केली आहे.