सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली प्राण्यांमुळे शेतीत मोठं नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधील गावांमध्ये गवा रेड्यांच्या कळपांचा वावर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. हे गवे सैरावैरा पळताना किंवा मार्ग बदलताना झालेल्या अपघातांमुळे काही नागरिक जखमी झाले आहेत, तर यापूर्वी काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
नेमळे परिसरात गव्यांकडून भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यांत्रिक उपकरणांच्या मदतीने मशागत करून, महागड्या बियाण्यांची पेरणी करून शेतकरी भात लावणी करतात. मात्र, या सर्वांचा खर्च काढला तर त्यांना काहीच परवडत नाही. त्यातच कीड, रोग, निळा भुंगा, अति पाऊस यामुळे पीक वाहून जाणे किंवा कुजून जाणे अशी नैसर्गिक संकटंही शेतकऱ्यांवर येतात. आता वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान त्यांच्यासाठी नवीन डोकेदुखी ठरले आहे.
नेमळे गावात, कुंभारवाडी, फौजदारवाडी, देऊळवाडी, एरंडवाकवाडी, धारकरवाडी, पाटकरवाडी आणि पोकळे नगर या परिसरांमध्ये गव्यांचा मोठा वावर दिसून येतोय. प्रत्येक ठिकाणी १५ ते २० गव्यांचे कळप रोज दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहेत. यामुळे नेमळे गावात एकूण ५० ते ६० गव्यांचा वावर असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. हे गवे भात लावणीची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत, तसेच त्यांनी चार-पाच वर्षांपूर्वी लावलेली आंब्याची आणि काजूची कलमेही उपटून टाकली आहेत.
गव्यांच्या भीतीमुळे जंगलाशेजारील जवळजवळ तीनशे एकर शेतजमीन पडीक ठेवली आहे. वनविभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तुटपुंजी नुकसानभरपाई दिली जाते. एकतर प्रतिगुंठा नुकसानभरपाई वाढवून द्या, नाहीतर गव्यांचा बंदोबस्त करा, अशी लेखी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.