छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. संत एकनाथांच्या पैठणमध्ये दिवसभरात सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळाली. तर वाळूजजवळील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या मंदिरात दर्शनासाठी लाखाेंचा जनसागर दाखल झालेला होता. विठ्ठल -रुक्मिणीच्या गजराने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता.
प्रति पंढरपूरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांसह दर्शनासाठी हजेरी लावली होती. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. प्रति पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी दिसणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात होता. छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांतील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी दाखल होत होते. रेल्वे स्टेशनसह प्रमुख भागांमध्ये फराळाच्या खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येत होते. नर्सरीपासूनच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विठ्ठल-रुक्मिणी रूपातील वेशभूषा करून आणले जात होते. फुगडी खेळून, दिंडी, पालखी काढून भक्तीचे धडेही देण्यात होत होते.
पैठणमध्ये पहाटे काकडा आरतीने एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. पैठणचे आमदार विलास भुमरेंसह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत समाधी मंदिरात पूजा करण्यात आली. दिवसभरात पैठणमध्ये सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक महेश खोचे यांनी दिली.