सांगली : पश्चिम घाटातील पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील विसर्ग सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून दहा हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने कृष्णा, वारणा नदीला पूर आला आहे. कृष्णेतील पाणीपातळी वाढल्याने औदुंबरमधील दत्त मंदिराच्या सभा मंडपात पुराचे पाणी शिरले आहे, तर सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीत तयार झालेला पाण्याचा फुगवटा कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या दरवाजातून १ लाख २० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २४ फूट ९ इंचांवर पोहोचली असून, महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे.
गेल्या चार दिवसांंपासून पश्चिम घाटात सुरू असलेली संततधार आता कमी झाली असून, गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वर, नवजा आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. कोयना धरणातून ३१ हजार ७४६ ययुसेकने विसर्ग केला जात होता. मात्र, सायंकाळी पाच वाजता वक्र दरवाजे सहा फूट सहा इंचांवरून ४ फूट करण्यात येणार असून, यामुळे विसर्गही कमी होणार आहे. सायंकाळनंतर वक्र दरवाजातून १९ हजार ७२४ आणि पायथा विद्युतगृहातून २१०० असा २१ हजार ८२४ क्युसेकने विसर्ग केला जात असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले. तरीही नदीतील पाण्याची पातळी मंगळवारी दुपारपर्यंत स्थिर राहील. यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा कायम असल्याचे सांगण्यात आले.
कोयनेतून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीवरील बहे, नागठाणे, डिग्रज, सांगली, म्हैसाळ आणि राजापूर (जि. कोल्हापूर) हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भिलवडी पूल येथे २८ फूट ८ इंच, तर आयर्विन पूल येथे पाणीपातळी २४ फूट ९ इंच झाली असून, औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिराच्या सभामंडपात कृष्णेचे पाणी शिरले आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणातून केला जात असलेला १४ हजार ८८० क्युसेकचा विसर्ग कायम आहे. यामुळे नदीचे पाणी बाजूच्या पिकात शिरले असून, हरिपूर संगमाच्या ठिकाणी विस्तीर्ण पात्र पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात १५ मिलिमीटर नोंदला गेला.