सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या अनुदानातील ५ कोटी ३६ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ७ जणांना बडतर्फ तर १४ जणांना निलंबित करून फौजदारी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी मंगळवारी लोकसत्ताशी बोलताना दिली. अपहार झालेल्या रकमेपैकी ३ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात बँक प्रशासन यशस्वी झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांपासून बँकेच्या विविध शाखांचे परीक्षण करत असताना बँकेच्या १४ शाखांमध्ये अनामतपोटी जमा असलेल्या अनुदानाच्या रकमेमध्ये अपहार झाल्याचे समोर आले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळणारे अनुदान शाखेमध्ये अनामतपोटी जमा होते. या रकमेवर काही कर्मचाऱ्यांनी बनावट खात्यावर या रकमा वर्ग करून त्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणी बँकेचे २२ कर्मचारी दोषी असल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यापैकी एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला असून, उर्वरित २१ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
२१ पैकी १४ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, दोष सिद्ध झालेल्या ७ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. निलंबन कारवाई झालेल्या १४ जणांवरही पुढील कारवाई होणार असल्याचे श्री. वाघ यांनी सुतोवाच केले. या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, फौजदारी कारवाई सुरू आहे.
दरम्यान, अपहार झालेल्या ५ कोटी ३६ लाखांपैकी ३ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम बँकेने संबंधित अपहारकर्त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केली असून, उर्वरित रक्कम वसुलीचे प्रयत्न सुरू आहेत. अपहाराची रक्कम संबंधितांनी भरली नाही तर संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवून ती वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी
मराठवाड्यात पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अपरिमित हानी झाली. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा बँकेने राज्यात सर्वांत अगोदर एक कोटीची मदत जाहीर केली. हा मदत निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला आहे. तसेच बँकेच्या ४५० कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १७ लाख २२ हजारांची स्वतंत्रपणे मदत देण्यात आली असून, ही रक्कमही मुख्यमंत्री मदत निधीला देण्यात आली असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.