Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

‘मी या ठिकाणी काय नावं घ्यायला आलोय का? मी बायकोचं कधी नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता?’, असं म्हणत अजित पवार यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर एका कार्यकर्त्याने रस्त्यावरील डिव्हायडरून कुत्रे उडी मारत असल्याची तक्रार केली. त्यावर अजित पवारांनी डोक्याला हात लावत म्हटलं की, ‘मी कुत्र्यांना सांगतो की उडी मारू नका’, असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

अजित पवार काय म्हणाले?

“ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. आमची देखील पंचायत होते. कारण चांगलं काम झालं नाही तर आम्ही फडाफड बोलतो. कारण त्या कामांना आम्ही निधी दिलेला असतो. आम्हाला निधीच्या पै आणि पैचा हिशेब लागतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

‘पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यात…’

अजित पवार कार्यक्रमात बोलत असताना एका कार्यकर्त्याने ग्रामपंचायत कामांच्या संदर्भात अडवणूक होत असल्याची तक्रार केली. यावर अजित पवार म्हणाले की, “ग्रामपंचायती वाल्यांना कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी निवडून दिलं का? मला तुम्ही निवडून दिलं, पण ग्रामपंचायतीमध्ये निवडून देण्यासाठी मी आलो का? तुम्ही ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडून दिलं, तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्ही जे तुमचं योग्य काम करतात त्यांची बटने (मतदान करा) दाबा. आता पायताण घे आणि माझ्या डोक्यात हाण”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

‘मी कुत्र्यांना सांगतो उडी मारू नका…’

अजित पवार हे रस्त्यांच्या विकासाबाबत बोलत होते, एवढ्यात खाली बसलेल्या एका व्यक्तीने अजित पवारांकडे तक्रार केली आणि म्हटलं की, ‘दादा रस्त्यावरील डिव्हायडर मोठे करा. कुत्रे अचानक उडी मारतात आणि गाडीसमोर येतात.’ त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की. “हो मी आता कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका”, असं म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर पुढे अजित पवार म्हणाले की, “देवा बारामतीला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला बारामतीशिवाय कोणी नाही.”

‘मी बायकोचं नाव कधी घेतलं नाही…’

अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना अनेकांची नावे घेतली. मात्र, त्यावेळी एका व्यक्तीने म्हटलं की, सरपंच राहिलेल्या एका व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं नाही. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “आता कोणाकोणाचे नावे घेऊ. मी या ठिकाणी नावे घ्यायला आलोय का? मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता? मी येथे काय उखाणे घ्यायला आलोय का?”, असं अजित पवारांनी म्हणताच पुन्हा एकदा कार्यक्रमात एकच हशा पिकला.