केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवर आज सुनावणी झाली आणि त्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. जो आज जाहीर करण्यात आला. कलम ३७० रद्द करणं योग्यच निर्णय असं न्यायालयाने म्हटलं. या निकालाबाबत आज अधिवेशनात आलेल्या उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. तसंच मोदी काश्मिरी पंडितांची गॅरंटी घेणार का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पाकव्याप्त काश्मीर भारतात आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. जे असंभव वाटत होतं ते मोदींनी संभव करुन दाखवलं आपण काही काळ वाट पाहू. इतकी वर्षे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ३७० हटवलं पाहिजे ही मागणी सातत्याने केली होती. त्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम मोदींनी केलं. मात्र मोदी जेव्हा हे काम करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी. इकडेही आणि तिकडेही तबलाही आणि डग्गाही अशी राहिली आहे. त्यांना या संदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही आहे. उद्धव ठाकरेंनी खरं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जे मुद्दे मांडले त्याच्या विपरीत भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेला सातत्याने साथ दिली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज लागलेल्या निकालांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेऊन संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक घेण्याआधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणक घेता येईल. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो कायम आपला भाग राहील.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या तर आनंदच होईल. परंतु, त्याआधी काश्मीर सोडून गेलेल्या काश्मिरी पंडितांना परत काश्मीरमध्ये आणण्याची गॅरंटी कोण देणार? येणाऱ्या निवडणुकांआधी ते परत येतील याची गँरंटी कोणी देईल का? पंतप्रधान मोदी तरी देतील का? कारण हल्ली गॅरंटीचा काळ आहे. ते सतत गॅरंटी-गॅरंटी म्हणत असतात.