सातारा : नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरे (ता. महाबळेश्वर) येथे बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसी हनुमंत हेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ११५३ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा या चार तालुक्यांतील २६५ गावांचा समावेश आहे. या क्षेत्रात पर्यटनवाढीच्या अनुषंगाने अनेक योजना प्रस्तावित आहेत.पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विकास केंद्र संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बामनोली जलपर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार असून, यामध्ये साहसी उपक्रम, नौकाविहार, रोपवे असे उपक्रम राहणार आहेत. यासाठी २० गावांमध्ये होम स्टे, ॲग्रो टूरिझम योजनादेखील राबविण्यात येणार आहेत.
१४ उद्योग समृद्धी केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे. कृषी उत्पादन प्रक्रिया, तयार उत्पादने, बांबू आधारित उत्पादने, औषध आधारित उत्पादने यांचा समावेश राहील. ४४ ग्रामसमूह विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होईल, असा विश्वास या प्रकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या विकासासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन अशा योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत. पाच एकरांवर न्यूरोपॅथी सेंटर, शंभर एकरांमध्ये आयुष मंत्रालयामार्फत बोटॅनिकल गार्डन प्रस्तावित आहे.