लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : करमाळा तालुक्यातील पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके अदा करण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीत २० हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या करमाळ्यातील उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. बबन हिरालाल गायकवाड असे या कारवाईत सापडलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक १ मार्फत करमाळा तालुक्यातील वांगी, वीट, चोपडे वस्ती, वरकुटे, साडे, झरे आदी गावांच्या शिवारात रस्त्यांची सुधारणा करण्याची कामे करण्यात आली आहेत. या कामांची निविदा यातील तक्रारदार हे पर्यवेक्षक म्हणून सेवेत असलेल्या एका कंत्राटदाराला मंजूर झाली होती. त्यानुसार पूर्ण केलेल्या कामांचे प्राथमिक देयक पाच लाख ८७ हजार ८६१ रुपयांचे मंजूर होऊन रक्कम प्राप्त झाली होती. उर्वरित दोन कामांचे देयक प्रलंबित आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी उपअभियंता बबन गायकवाड यांनी ३० हजारांची लाच मागितली. तडजोडीत २० हजार रुपये देण्याचे ठरविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तथापि, याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाने सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. त्याची पडताळणी केल्यानंतर करमाळा येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. यात गायकवाड हा लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात उपअभियंता बबन गायकवाड याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.