Devendra Fadnavis on Clash at Vidhan Bhavan : विधान भवन परिसरात गुरुवारी (१७ जुलै) झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितलं. त्यानंतर पडळकर उभे राहिले व त्यांनी घडलेल्या प्रकारावर खेद व्यक्त केला. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. विधान भवनात राडा झाला तेव्हा देखील त्यांच्या नावाने धमक्या दिल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांना आलेल्या धमकीच्या संदेशांचा आव्हाडांनी उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी बाकावरील आमदारांनी आक्षेप घेतला.

जितेंद्र आव्हाड त्यांना आलेल्या धमकीबाबत माहिती देत असताना सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं व मूळ विषयावर बोलण्यास सांगितलं. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, “आव्हाडांना बोलू द्या, त्यांचं बोलणं थांबवू नका.” यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “काल इथे जे काही झालं त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतीष्ठा गेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. हे काही बरं नाही. आज बाहेर एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीयेत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत.”

“तुम्ही कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही?” फडणवीसांचा सवाल

मुख्यमंत्री म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. तो उल्लेख करण्यास आमची मनाई नाही. परंतु, सध्या जो विषय चालू आहे त्यावर बोललं पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडला असेल तर त्यावर चर्चा करायला हवी. तुम्ही लोक (विरोधक) कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही? आव्हाड यांचं जे काही म्हणणं असेल ते वेगळं मांडता येईल. परंतु आत्ता विधानसभा अध्यक्षांनी आपल्याला एक विषय दिला आहे. त्यावर बोलूया. जयंत पाटीलजी तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही तरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागले आहेत”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण ज्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहोत की काही एका व्यक्तीची प्रतिष्ठा नाही. ती या सभागृहाची प्रतिष्ठा आहे आणि ती आपण जपली पाहिजे. आज बाहेर लोकांच्या शिव्या पडत आहेत लोकांच्या शिव्या या काही एकट्या गोपीचंद पडळकर किंवा त्यांच्या (जितेंद्र आव्हाड) माणसाला पडत नाहीयेत. सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागले आहेत. हे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून चालणार नाही. हे बरोबर नाही अशा वक्तव्यांचं समर्थन योग्य नाही.