विधानसभेत आज अजित पवार विरूद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सगळ्या महाराष्ट्राने पाहिला. तर दुसरीकडे विधान परिषदेत नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसे यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. एवढंच नाही तर एकनाथ खडसेंनी काढलेला तो विषयच आपल्या खास शैलीत निकाली काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले एकनाथ खडसे?
विदर्भासाठी आत्ता पॅकेज वगैरे जाहीर केलं गेलं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घोषणा केली होती. त्याचं नेमकं काय झालं? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस यांचं नाथाभाऊंना आपल्या खास शैलीत उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आपल्या शैलीत उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाथाभाऊंनी नवा शोध लावला आहे. मी असं काही बोललोच नव्हतो. अहो नाथाभाऊ माझ्या लग्नात तुम्ही आला होतात. तेव्हा तुम्ही आमचे नेते होतात. मी जर अशी काही घोषणा वगैरे केली असती तर तुम्ही थांबवलं असतं ना माझं लग्न” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ज्यानंतर सभागृहातले आमदार हसू लागले. यानंतर आपण हे वृत्तपत्रात वाचल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं ज्यावर लगेच माझ्यावर विश्वास ठेवा असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाच निकाली काढला
देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले की वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केल्याचं नाथाभाऊ म्हणाले. पण अशी कुठलीही घोषणाच मी केलेली नाही. पेपरमध्ये काय छापतात त्यावर विश्वास ठेवू नका. आपण अशा घोषणा करतो ज्या पूर्ण होऊ शकतात. तुम्ही पेपरवर विश्वास ठेवण्याच्याऐवजी माझ्यावर विश्वास ठेवा. मी जर असं काही बोललो असतो तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं तुम्ही मला म्हणाला असतात ना वेगळ्या विदर्भाची घोषणा केली आहे थांबा. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा विषयच निकाली काढला.

एकनाथ खडसे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
विदर्भावर सतत अन्याय होत असल्याने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. विदर्भ जोपर्यंत वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञाच देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली होती त्या प्रतिज्ञेचं काय झालं? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातलं वैर सर्वश्रुत
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला बरबाद करण्याचा प्रयत्न केला हे त्यांनी सांगत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांची उत्तर महाराष्ट्रावर पकड आहे. त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हे धक्कादायक मानलं गेलं होतं. संधी मिळेल तेव्हा तेव्हा एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या पुन्हा येईन या वक्तव्याची खिल्लीही उडवली आहे. मात्र बऱ्याचदा या सगळ्यावर उत्तर देणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे. अशात वेगळ्या विदर्भावरून जे एकनाथ खडसे बोलले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer to ncp leader eknath khadse about his comment on separate vidarbha scj
First published on: 29-12-2022 at 19:45 IST