अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून नाव देण्याची मागणी होत आहे. आपलं हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारे आपण आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर आणि धारशिव नामकरण केलं आहे. तुमच्याच नेतृत्वात अहिल्यानगर झालं पाहिजे. मुख्यमंत्री छत्रपतींचे मावळे आहेत, त्यामुळे अहिल्यानगर होणारच, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते चौंडीत बोलत होते.
“देशाच्या इतिहासात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो की न्यायप्रिय राजा. तशाप्रकारचं न्यायप्रिय शासन राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी चालवलं,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“२२ वेगवेगळ्या योजनांचा लाभ धनगर समाजाला करून दिला”
“पावसाळ्यात चराईत जमीन आम्हाला नेमून द्या, ही गेल्या २५ वर्षाची मागणी होती. ती पूर्ण करत मेंढपाळांना चराई राखून ठेवण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. तरुण-तरुणींसाठी वेगवेगळ्या योजना केल्या. धनगरवाड्यांना जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. २२ वेगवेगळ्या योजनांचा लाभ धनगर समाजाला करून दिला,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
“धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे”
“युतीचं सरकार असताना एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देत कामाला सुरुवात झाली. पण, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर एक फुटकी कौडी त्यातील मिळाली नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर पुन्हा जीआर काढत १ हजार कोटी रुपये देण्याचं काम केलं. धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या धनगरांना बेघर राहू देणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!
“शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार काम करते”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीत कॉरिडर करताना राज्य कोणासारखं चालवायचं, तर राजमाता यांच्यासारखं चालवायचं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावर सरकार काम करत राहिल,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.