राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर कधी टोमणा मारत तर कधी परखड टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या टीकेचा देखील उद्धव ठाकरेंनी समाचार घेत प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर राजकीय सभेमध्ये बोलणार असल्यामुळे या सभेबाबत मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. या पार्श्वभूमीवर सभा झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक ट्वीट करत टोला लगावला आहे.

काय आहे ट्वीटमध्ये?

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंवर नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावण्यात आला आहे. “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर त्यावरून शिवसेना आणि भाजपा-मनसे यांच्यात सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

“आपण एक मे जेव्हा साजरा करत होतो, तेव्हा भाजपाची सभा होती. तेव्हा सभेत फडणवीस चुकून बोलून गेले, जे पोटात होतं ते ओठात आलं. त्यांच्या मालकाची इच्छा बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

Uddhav Thackeray BKC Rally : “…तर महाराष्ट्र असा पेटेल, की तुम्हाला पळता भुई थोडी होईल”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपाला खुलं आव्हान!

“आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत”, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.