Devendra Fadnavis on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडवले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं याचा आनंद आहे असे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न करतोय.”

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कायद्याच्या चौकटीतील ज्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चित मान्य करू. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर योग्य प्रतिसाद सरकारकडून मिळेल.”

जरांगेंचं उपोषण स्थगित

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले असले तरी त्यांनी पुढे मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरकारला दिला आहे. सग्या सोयऱ्यांची अमलबजावणी आम्हाला पाहिजेच आहे. ती झाली नाही तर आता लवकरच मुंबईतल्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.

मुंबईत जर आंदोलन सुरु केलं तर तिथून काही माघार घेणार नाही. आपल्याला मुंबईला पोलिसांनी मारलं तरीही पोलिसांना बोट लावायचं नाही. पण, मंत्र्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला. तसेच, आता हे आंदोलन स्थगित करत आहे, या जागेवर सभामंडप करायचा आहे. यापुढे शक्यतो आता उपोषण करायचं नाही, समोरासमोर लढायचं आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकर अमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करेन, तेव्हा मुंबई जाम होऊ शकते, यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत, असंही मनोज जरांगे म्हणाले.