सोलापूर : आयटी पार्कच्या माध्यमासह दररोज पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने जलवाहिनीच्या ८७२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सोलापूर-गोवा विमानसेवेच्या पाठोपाठ आता मुंबई आणि पुणे विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ‘माझं सोलापूर सुंदर सोलापूर’ हा संकल्प असून साकार करण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेतर्फे ११२८ आणि शेळगी येथील श्री सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत २२० अशा एकूण १ हजार ३४८ सदनिकांच्या वितरणाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, समाधान आवताडे, दिलीप सोपल, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, देवेद्र कोठे आदींची उपस्थिती होती. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्ताविक केले.

सोलापुरात ४८ हजार कुटुंबांना हक्काची घरे बांधून देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यापैकी २५ हजार घरे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. २० हजार घरांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित घरांचे काम सुरू आहे. सामान्यांसाठी घरे उभारण्याचा सोलापूर पॅटर्न राज्याला मार्गदर्शक ठरणार असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० लाख घरकुलांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत प्रतीक्षा यादीतील येत्या दोन वर्षांत सर्व नागरिकांना घरे देण्यात येणार आहेत. या ३० लाख घरांना केंद्र सरकारच्या अनुदानाबरोबरच राज्य सरकार ५० हजार अनुदान देईल आणि प्रत्येक घरावर सौरऊर्जेचा वापर करून त्यांना मोफत वीज उपलब्ध होईल. याच पद्धतीने सुंदर घरे उभारून ‘सोलापूर पॅटर्न’ तयार झाला आहे. यापूर्वीच्या आणि आता हजारो घरे स्वस्तात बांधून देण्याचा अनुभव पाठीशी असलेले अंकुर पुंदे यांनी एखाद्या खासगी विकासकाला लाजवेल अशी घरे बांधून देण्यात आली आहेत. सोलापूरने महाराष्ट्राला गरजूंना कमी खर्चात दर्जेदार घरे बांधून देण्याची दिशा दाखवली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.पालकमंत्री गोरे यांनी गृहनिर्माण प्रकल्पामुळे सोलापूर शहराच्या वैभवात भर पडली असून लवकरच आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेतलेल्या या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांमुळे लाभार्थ्यांना रस्ते, आरोग्य आधी चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.